whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट, मुलगा सिद्धार्थ बनसोडेसह १० जणांवर गुन्हा दाखल

तारीख : 13-05-2021श्रेणी :गुन्हेगारी

feature image
whatsapp

Pune News : मराठा आरक्षणावरून शरद पवारांवर टीका, नामदेव जाधव यांना फासले काळे; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

तारीख : 20-11-2023श्रेणी :गुन्हेगारी

feature image

पुणे (Pune) : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा अधीकच चिघळताना पाहायला मिळतोय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी, विरोधक व अनेक पक्षात एकमेकांवरच राजकीय चिखलफेक होताना दिसतीये. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर लेखक प्रा. नामदेव जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना टीका केली. मात्र यावेळी तेथे आलेल्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्रा. जाधव यांना धक्काबुक्की करून काळे फासण्यात आले. शनिवारी (दि. १८) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास नवी पेठेतील पत्रकार भवनासमोर ही घटना घडली.

याबाबत जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जाधव यांचे भांडारकर विद्या संशोधन महाविद्यालयामध्ये शनिवारी दुपारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मात्र, सुरक्षिततेच्या कारणावरून पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी जाधव सायंकाळी पाचच्या सुमारास नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आले. तेथे ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तेथे आले. कार्यकर्त्यांनी जाधव यांना धक्काबुक्की करून काळे फासले. या घटनेनंतर तेथे गोंधळ उडाला. त्यावेळी तेथे असलेल्या पोलिसांनी सुरक्षा कवच करून जाधव यांना वाहनामध्ये बसवले. तेथून जाधव विश्रामबाग पोलीस ठाण्यात गेले. जाधव यांनी फिर्याद नोंदवली. जाधव यांच्या बरोबर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून गणवेशावर शाई फेकण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
 

whatsapp

Maval News : ही कसली मनमानी! डाहुली ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व सरपंचाची थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

तारीख : 26-10-2023श्रेणी :गुन्हेगारी

feature image

टाकवे बुद्रुक (Takwe Budruk) : आंदर मावळातील डाहुली ग्रुप ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक रावते व सरपंच नामदेव शेलार हे परस्पर ग्रामपंचायतमध्ये मनमानी कारभार करत असल्याची तक्रार उपसरपंच बळीराम वाडेकर यांनी गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. 

निवेदनात म्हटले आहे की, गुरुवारी (दि. २६ ऑक्टोबर २०२३) रोजी सकाळी साडेदहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मी उपसरपंच या नात्याने ग्रामपंचायत कार्यालयात ठराविक वेळेनुसार उपस्थित होतो. मात्र या मीटिंगसाठी ग्रामसेवक, विद्यमान सरपंच व इतर सदस्य हे १५ मिनीटे उशीराने आले. त्यानंतर मिटींगची सुरूवात करण्यात आली व हजेरी बुकावर सह्या करण्यात आल्या. 

मात्र सदर मिटींगचा विषय क्र. १ नूसार मागील सभेच्या कामकाजाचा वृत्तांत वाचून कायम करणे असा विषय पटलावर असताना ग्रामसेवक रावते यांनी तो डावलून परस्पर विषय क्र. २ चे वाचन सुरू करण्यास सुरूवात केली. त्यावेळी मी ग्रामसेवक यांना विषय क्र.१ बाबत विचारणा केली असता ग्रामसेवक यांनी सुरूवातील ‘ते अजुन लिहिलेले नाही, अपुर्ण आहे‘ असे सांगून घुलवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी त्यांना याबाबत विचारणा केली असता ग्रामसेवक यांनी “आता ते माझ्यासोबत आणलेले नाही, ते मी विसरलो” असे उत्तर दिले. 

त्यावेळी विद्यमान सरपंच नामदेव शेलार यांनी निष्कामी हस्तक्षेप करून “प्रत्येक मिटींगला तुम्ही का येत नाही, प्रोसेडींग दाखवत नाही काय करायचे ते कर” असे म्हणून माझ्याशी विनाकारण वादविवाद सुरू केला. वास्तविक शासनाचे प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवक यांना प्रोसेडींगबाबत विचारणा करण्याचे सर्वस्वी अधिकार सदस्य व उपसरपंच या नात्याने मला आहे. असे असताना देखील मला ग्रामसेवक व विद्यमान सरपंच यांनी संगनमत करून अडवले व त्यावेळी सरपंच यांनी मला अर्वाच्य भाषेत भर सभेत शिवीगाळ करून “जा तुला काय करायचे ते कर” असे सांगीतले.

वास्तविक ग्रामसेवक रावते हे यापुर्वी देखील मी स्वतः उपसरपंच असताना त्यांना अनेक विषयाबाबत माहिती विचारली असता कोणतीही माहिती न देता अथवा त्यासंबंधी कागदपत्र न देता नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देत आले आहे व आज देतो उद्या देतो अशी बतावणी करतात. अशा प्रकारे ग्रामसेवक व विद्यमान सरपंच हे गैरवर्तन करून त्यांचे अधिकाराचा गैरवापर करत आलेले आहे. 

कार्यालयात मी यापूर्वी बी. डी. ओ. यांना ग्रामपंचायत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी विनंती केलेली होती. तरी आजतागायत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे सदर ग्रामपंचायतची विद्यमान कार्यकारणी जाहीर झाल्यापासून विद्यमान सरपंच नामदेव शेलार हे माझ्यासारखे उपसरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्यांना दमदाटी करून प्रत्येकवेळी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. 

तरी याबाबत ग्रुप ग्रामपंचायत डाहुली यांच्या गुरुवार (दि. २६/१०/२०२३) रोजीच्या मासिक मिटींगमध्ये विद्यमान सरपंच नामदेव शेलार यांनी केलेल्या गैरवर्तणुकीबाबत तसेच ग्रामसेवक रावते यांनी गैरवर्तन करून त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केल्याबाबत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच याबाबत वडगाव मावळ पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिली असल्याचे तक्रारदार यांनी प्रजावार्ता प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

whatsapp

Takwe News : टाकवे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाकडून २५ टक्के कमिशनची मागणी; ठेकेदाराचे आत्महत्येचे पत्र वायरल

तारीख : 06-10-2023श्रेणी :गुन्हेगारी

feature image

टाकवे बुद्रुक (Takwe Budruk) : टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून गावातील ड्रेनेज लाईन आणि रस्ता काँक्रीटीकरण करण्याचे काम मागील काही महिन्यांपूर्वी राठोड यांच्या अंतर्गत असणारा ठेकेदार महेश आढे या ठेकेदाराने केले होते. सदर कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदार गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा करत आहे. परंतु सदर कामाचे बिल काढण्यासाठी सरपंच सुवर्णा बाबाजी असवले बिलाच्या रक्कमेतील २५ टक्के रक्कम मागत असल्याचा आरोप ठेकेदाराने केलाय.

तसेच या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असून याला सर्वस्वी सरपंच सुवर्णा असवले व ग्रामसेवक सुभाष बांगर जबाबदार राहणार असे नमूद असल्याचे पत्र वायरल झाले आहे. आढे यांनी सर्व प्रसार माध्यमांना व लोकप्रतिनिधींना ही सुसाईड नोट पाठवली आहे. बघता बघता ही न मावळात वाऱ्यासारखी पसरली. परिणामी '२५ टक्के आणि टाकवे ग्रामपंचायतीचा कारभार ओके' अशी चर्चा संपूर्ण तालुकाभर रंगली आहे.

याबाबत ग्रामसेवक सुभाष बांगर यांना विचारले असता त्यांनी, सदर बिल काढण्यासंदर्भातील कागदपत्रावर माझी सही झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तर सरपंच सुवर्णा असवले यांच्याकडून तो ठेकेदार आमचा नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दोघांकडूनही अंगकाढूपणा होताना दिसतोय किंवा ठेकेदाराच्या आरोपातून असवले व बांगर या दोघांचीही नाहक बदनामी होत आहे, हे येणारा काळच सांगेल.

ठेकेदार राठोड यांच्या माध्यमातून मी ही कामे केली. गटरच्या कामाचे १९ लाख, गटरच्या अधिक कामाचे ५ लाखाचे बिल झाले. रस्त्याच्या कामाचे ८ लाख अशी एकूण ३२ लाखांची बिले आहेत. त्यातील मला १५ लाख मिळाले आहेत. उर्वरित बिलांवर ग्रामसेवक यांची सही असून सरपंच सुवर्णा असवले यांनी २५ टक्के रकमेची मागणी केल्याने मला ती मान्य नाही आणि त्यामुळे माझी बिले मला मिळत नाही. बिल पास होण्यासाठी सरपंच स्वाक्षरी करत नाहीत, या सर्व त्रासाला कंटाळून मी आत्महत्येचा शेवटचा निर्णय घेतला आहे.
- महेश आढे (ठेकेदार)

या ठेकेदाराने पूर्वी दोन रस्त्याची कामे केली आहेत. त्यानंतर त्याने गटरचे काम केले आहे. व त्यानंतर एका रस्त्याचे काम केले आहे. पूर्वीच्या दोन रस्त्याचे बिल व गटरच्या कामाचे १० लाख बिल त्यांना दिली आहेत. गटरच्या कामाचे ९ लाख व एका रस्त्याचे ८ लाख त्यांना देणे बाकी आहे. २५ टक्के कमिशन मागणीत माझा काही रोल नाही.
- सुभाष बांगर (ग्रामविकास अधिकारी)

संबंधित ठेकेदार आढे हा आमचा ठेकेदार नाही. आम्ही पंधरावा वित्त आयोगातील कामे ही राठोड या ठेकेदाराला दिलेली आहेत. ठेकेदार आढे यांनी वायरल केलेल्या सुसाईड नोट संदर्भात मी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. पोलीस योग्य तो शोध लावून पुढील कारवाई करतील. आढे या ठेकेदाराशी आमचा काही संबंध नाही.
- सुवर्णा असवले (सरपंच, टाकवे बु.)

whatsapp

Talegaon News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा कचरा व्यवस्थापनात भोंगळ कारभार, उद्या सर्वपक्षीय लाक्षणिक ठिय्या आंदोलन

तारीख : 16-08-2023श्रेणी :गुन्हेगारी

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराविरुद्ध सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक झाली आहे. कचरा व्यवस्थापन कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक त्रुटी आढळत असून केवळ कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी मुख्याधिकारी वेळ काढूपणा करत आहेत. ही बाब खेदजनक असून नगरपरिषद प्रशासनाच्या कचरामय मनोवृत्तीविषयी उद्रेक निर्माण झाला आहे. त्यामुळे नगरपरिषद आवारात उद्या बुधवारी (दि. १७) रोजी सकाळी १० वाजल्यापासून सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व तळेगावकर त्रस्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जनसेवा विकास समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

जनसेवा विकास समितीने दिलेल्या माहितीनुसार, कचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहाराबाबत यापूर्वी नगरपरिषद मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. कचरा व्यवस्थापन कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक त्रुटी आढळल्या असल्यामुळे सदर कॉन्ट्रॅक्टर व तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावर विद्यमान मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी पत्रव्यवहार करून कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्याच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या मुख्याधिकारी पाटील यांनी अनेक सफाई कामगारांचे जीव धोक्यात घातलेले आहेत.



सफाई कामगारांचा गेल्या दहा महिन्यांपासून पीएफ फंड, वैद्यकीय इएसआय वर्गणी भरलेली नाही, शासकीय देणे न देता देखील तत्कालीन मुख्याधिकारी यांनी कॉन्ट्रॅक्टरचे बिल अदा केले आहे. हा सकृत दर्शनी गंभीर गुन्हा असून सदर तत्कालीन मुख्याधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना चौकशीचे कारण देत सर्व परिस्थिती माहिती असून देखील एन. के. पाटील हे वेळ काढू पणा करत आहेत व सदर कॉन्ट्रॅक्टरला संधी देत आहेत, ही गोष्ट खेदजनक असल्यामुळे उद्दीग्न होत ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे जनसेवा विकास समितीकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आलेले आहे.

पुढे म्हटले आहे की, सुमारे १८ महिन्यांपासून कचरा व्यवस्थापन कॉन्ट्रॅक्ट सुरू आहे. सदर कॉन्ट्रॅक्ट करताना तत्कालीन मुख्याधिकारी यांनी तांत्रिक मान्यता न घेतल्यामुळे महिना ५ लाख रुपये जनतेच्या कष्टाच्या व घामाच्या टॅक्स रुपी रकमेचे नुकसान झाले आहे. तसेच सदर बिलिंग हे नफा फंडातून होत असल्यामुळे जनतेची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांकडे देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. परंतु विद्यमान मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्यासमोर सर्व बाबी पारदर्शक असताना देखील पीएफ फंड व वैद्यकीय इएसआय वर्गणी न भरणे हा अक्षम्य अपराध असून देखील कारवाई न करणे याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. तसेच जर एखाद्या सफाई कामगाराचा वैद्यकीय प्रश्न निर्माण झाला, तर त्याला सर्वस्वी विद्यमान मुख्याधिकारी एन. के. पाटील जबाबदार असतील, असे समितीने म्हटले आहे.



तळेगावला कचरा व रस्त्यांच्या समस्यांचे ग्रहण

दरम्यान, तळेगावमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. जागोजागी कचरा पडलेला आहे. मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीतील रस्त्यांच्या खोदकामामुळे नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात चिखल साठत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. कचऱ्याच्या घंटागाड्या कधीही वेळेवर येत नाहीत. आपल्या मनमर्जीप्रमाणे कचरा गोळा करणे हे महिला वर्गासाठी तसेच नोकरदार महिला वर्गासाठी अत्यंत त्रासदायक असल्याने प्रत्येक गल्लीमध्ये कचरा विषयक अनेक तक्रारी महिला वर्गाकडून करण्यात येत आहेत. ठेकेदाराकडून पुरवण्यात आलेल्या कामगारांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे निदर्शनास आले होते. सफाई कामगारांना पावसामध्ये कुठल्याही सुरक्षाविषयक वस्तूंचे वाटप करण्यात आलेले नाही.

अधिकाऱ्यांकडून टक्केवारीचे राजकारण

अनेक सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आजारी पडले असताना त्यांना शासकीय वैद्यकीय इएसआय सुविधेचा फायदा घेता आलेला नाही. कारण ठेकेदाराकडून वैद्यकीय इएसआय वर्गणी भरली गेली नाही. सदर सर्व बाबी माहित असताना देखील नगर प्रशासनाचे अधिकारी टक्केवारीचे राजकारण करत असल्याची चर्चा तळेगावमध्ये सुरू असल्याने तळेगाव शहराविषयी अधिकाऱ्यांना प्रेम राहिलेले नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कचरा कॉन्ट्रॅक्टर व नगरपरिषद प्रशासनाच्या कचरामय मनोवृत्तीविषयी उद्रेक निर्माण झाला आहे. सदर नागरिकांच्या सर्व समस्यांची शासन दरबारी दखल घेण्यात यावी, यासाठी तमाम तळेगावकर नागरिकांनी व सर्वच राजकीय कार्यकर्त्यांनी उद्या नगर परिषदेमध्ये सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

whatsapp

Justice for Swara : कोथुर्णे येथील निर्भया प्रकरणाला बघता बघता एक वर्ष उलटले! ना कुटुंबाला मदत मिळाली, नाही आरोपीला फाशी; पीडितेला न्याय मिळणार का?

तारीख : 02-08-2023श्रेणी :गुन्हेगारी

feature image

वडगाव मावळ (Vadgaon Maval) : पवनानगर परिसरातील कोथुर्णे (ता. मावळ) गावातून एका सात वर्षीय चिमुकलीचे २ ऑगस्ट २०२२ रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि आसपासच्या गावांमध्ये तिचा शोध सुरु झाला. बघता बघता दिवस मावळला आणि रात्र झाली. ना मुलगी सापडली ना आईवडिलांच्या डोळ्यातले अश्रू थांबले. त्यांनतर तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गावातील मंदिरासमोर खेळत असलेली ही मुलगी २ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. गावातील नागरिकांसह तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते.

मात्र दुसरा दिवस उजडला आणि पोलिसांनी कसोशीने केलेल्या तपासात तिच्याच गावातील तिच्याच जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील बाजूस तिचा खून झालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आणि सर्वत्र एकच खळबळ माजली. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला. या क्रूर प्रकारामुळे मावळ तालुक्यासह पुणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले. घटनेच्या निषेधार्थ मावळ एकवटला आणि ठिकठिकाणी आरोपीला अटक करण्यासाठी निषेध मोर्चे निघू लागले. तिला न्याय मिळवण्यासाठी बजरंग दलासह ठिकठिकाणी कँडल मार्च काढण्यात आले. तर दुसरीकडे आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे व पुणे ग्रामीण पोलिसांनी या निर्दयी घटनेची तात्काळ दखल घेत आरोपीचा मागमूस काढण्यात सुरुवात केली. सर्व बाजूंनी कौशल्यपूर्वक तपास करत अखेर दुर्गा श्वान पथकाच्या साहाय्याने आरोपी निष्पन्न झाला. तेजस महिपती दळवी (वय २५, रा. कोथुर्णे, ता. मावळ, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान ही घटना घडल्यापासून आरोपी मोकाट फिरत होता. तो आरोपी असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी त्याला लागलीच ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. त्यांनतर जे समोर आले त्याने सर्वांच्याच अंगावर शहारे आले. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याने तिला घरात बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. 

बघता बघता वातावरण चिघळले. आरोपी पहिल्यापासूनच नीच वृत्तीचा होता हे समोर येऊ लागले. त्यांनतर एकच सांतापाची लाट उसळली. आरोपीला फाशीची शिक्षा द्या ही मागणी जोर धरू लागली. ठिकठिकाणी निषेध मोर्चे निघाले. पीडितेला न्याय मिळवण्यासाठी अवघा मावळ एकवटला. राजकीय मंडळींनीही या प्रकरणातही राजकीय पोळी भाजून घेतली. सदर खटला फास्टट्रॅक पद्धतीने चालवू अशी आश्वासने दिली. संवेदनशील मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ कुटुंबियांना पाच लाखाची मदत जाहीर केली. मात्र ती मदत केवळ 'बोलाची कढी आणि बोलाचाच भात' असल्याचे समोर आले. अद्याप कुटुंबियांना कुठलीही मदत मिळाली नाही. पीडितेच्या कुटुंबियांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या राजकारण्यांनी केले.

त्यावेळी या पीडित कुटुंबाची महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, विरोधी पक्ष नेते अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार उमा खापरे, प्रकाश आंबेडकर, आदी राजकीय नेत्यांनी भेटी घेतल्या होत्या. त्यात आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात येईल, यासाठी प्रयत्न करू अशी व्यर्थ आश्वासने दिली. मात्र ना मदत मिळाली, ना आरोपीला अद्याप फासावर चढवला. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्यावेळी या घटनेची गंभीर दखल घेत कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासित केले. मात्र अद्याप आरोपी पोलीस कोठडीतच आहे.

दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी सरकारच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी येऊन ते उपोषण मागे घेण्यात आले व बजरंग दलाचे शिष्टमंडळ आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समवेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी मधून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र तिच्या कुटुंबीयांना अजून कोणतीच मदत मिळाली नाही. या घटनेला एक वर्ष उलटून गेली, तरी अजून ना त्या कुटुंबाला मदत मिळाली, ना पीडितेला न्याय मिळाला. त्यामुळे आरोपीला लवकरात लवकर फाशी मिळावी, त्याच्या मरणयातना आम्हालाही ऐकूद्या अन्यथा आम्ही एक स्त्री म्हणून स्वतःला माफ करू शकणार नाही, अशी आर्त साद परिसरातील महिलांनी राज्य सरकारला घातली आहे.

आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. सदर खटला हा शिवाजीनगर न्यायालयात फास्टट्रॅक पद्धतीने चालविण्यात येत आहे. न्यायालयाकडून मिळालेल्या तारखेला साक्षीदारांची साक्ष घेण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झाली. मात्र आता सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून मा. न्यायालय आरोपीला कठोरातील कठोर शासन करेल, यासाठी आवश्यक कागदपत्रांची आम्ही पूर्तता करत आहे.
- रवींद्र पाटील (पोलीस निरीक्षक, कामशेत)

प्रजावार्ता न्यूज नेटवर्क : अभिषेक बोडके/निलेश ठाकर  

whatsapp